top of page
Writer's pictureMadhura

श्रद्धा !!

आज तिन्हिसांजेला देवापुढे दिवा लावताना सहज एक विचार मनात तरळून गेला… का लावतो आपण देवासमोर दिवा? का प्रसन्न वाटते नुसते तिथे बसले तरी ?

मनातल्या गुंत्याला निगुतीने इथेच सोडवता येईल असे का वाटते? .. खरं तरं अजून माझी पिढी अशी आहे ज्यांनी आईला रोज अगदी नियमितपणे देवासमोर दिवा लावताना पाहिले आहे.. मग ती अगदी नोकरी करणारी आई का असेना.. रोज सात वाजले की देवासमोर बसलेच पाहिजे ..शुभंकरोती म्हटलीच पाहिजे.. नवीन श्लोक मुक्खोद्ग्त झालेच पाहिजेत.. हे कंपल्शन अगदी लहानपणापासून केल्याने असेल कदाचित… पण हळूहळू गोडी लागत गेली.. लहानपणी रागही येत असेल कदाचित.. नको ही वाटत असेल कदाचित.. अगदी मनाचे श्लोक लोळूनही म्हटले असतील निरर्थक निषेध दर्शवायला.. पण म्हटले होते..

तो उदबत्तीचा सुगंध .. ते मंद तेवणारे निरांजन याचे पवित्र्य कळण्याइतके मन परिपक्व ही नव्हते तेव्हा पण त्यासमोर बसून शुभंकरोती म्हणून घेणारी आई अगदी नेहमीपेक्षा काकणभर जास्तच प्रेमळ वाटायची… सारं कसं शांत आणि सौम्य वाटायचं..

आज वाटतं ..खरचं संस्कार हे न बोलताच होत असावेत .. कुठलाही अभिनिवेश न ठेवता केलेल्या कृतीतूनच रुजत असावेत.. देवघरातली आई , आजी बघूनच देवघराचे मह्त्व मन्मनी दाखल झाले.. आजही मोगर्‍याची फुलं पाहिली ना की बाळकृष्णाला सहस्त्र फुलांचा अभिषेक करणारी आजी डोळ्यासमोर येते… लोणी पहिले की ..पहाटे उठून काकडा करणारी आणि लोणीसाखरेचा नैवेद्य दाखवणारी आई डोळ्यासमोर येते.. आणि मग वाटते किती श्रद्धेने करत त्या हे सगळे.. ती श्रद्धाच आपल्यालाही वाट दाखवतेय का हे सगळे पुढे चालवायची… एका देवघरात किंवा आजच्या जमान्यातल्या किमान देव्हार्‍यात केवढी तरी ताकद सामावलेली असते नाही.. रोज प्रवचन वाचताना कुठेतरी मनातल्या कोड्यांची उत्तरे सापडताहेत असे वाटते.. जवळच आहे पण हातात येत नाही असेही होते कितीदा.. अर्थात अध्यात्मावर वगैरे लिहवे एवढी माझी शक्ती ही नाही आणि कुवत ही नाही पण आज फार तिव्रतेने वाटले की एवढा मोठा ठेवा आपल्याला मिळालाय आपल्याच माणसांकडून एक मोठी वसा.. पण आपण त्याला पुरेसे महत्व न देता नुसते पळतोय का अशा एका सुखाच्या चित्राकडे की जे खरेच चित्र आहे की केवळ एक आभासी प्रतिमा हे ही माहित नाही.. त्याच्या रेषा माझ्यासाठी आहेत का हे ही माहित नाही.. ना रंग ठाऊक ना रूप..पण ओढ तर भलतीच तिव्र.. बरं ते गवसल्यावर तरी मला आनंद होणार आहे की ही माहित नाही.. आणि ते मिळवण्यासाठी मी मात्र धावत रहातो.. सतत.. कधी माझ्या परिघात कधी परिघाबाहेरही.. पण खरचं तितक्या श्रद्ध्देने ते तरी करतो का आपण?

आज श्रद्धेला हद्दपार तर करत नाही आहोत ना आपण… भले ती देवावर असो वा कामावरती.. फक्त कसल्याशा वेगाने पछाडल्यासारखे वागतोय आपण सगळेच..


अजून आठवतयं मला… आम्ही घरातले सगळे.. म्हणजे.. आई-बाबा.. काका-काकू, दोन्ही आत्या आणि सगळ्यांची आक्खी घरं (चिल्लिपिल्ली वगैरे वगैरे..) दर डिसेंबरमध्ये जमायचो गोंदवल्याला.. काका सरकारी नोकरीत असल्यामुळे तिथेले सरकारी विश्रामगृह आम्हाला मिळायचे.. केवढाला मोठा हॉल आणि टुमदार सोपा असं काहीसं होतं ते.. समोर हे भले मोठे अंगण आणि तिथे चिक्कार चिंचेची झाडे.. अहाहा..काय मजा होती.. पहाटे उठून आई-काकू, आत्या सगळ्या काकड आरतीला जात..मग आपसूकच आमचेही पाय तिकडे वळत.. अजूनही तो प्रसन्न स्वर घुमतोय माझ्या मनात… अतिशय शांत वातावरण..एक वेगळ्याच चैतन्याने भारलेली सगळीच लोकं.. सुरेल स्वरांनी मंगलमय झालेली पहाट.. गुरूमहाराजांच्या आरत्या, भजनं, बाळकृष्णाचा लोणी-साखरेचा नैवेद्य आणि त्याचे ते अतिशत कर्णमधुर पद..

सगळं जग स्तब्ध झालयं आणि सारे रस एका भक्ती रसात नाहून निघालेत असे काहीसे वाटायचे.. काकडा होताच, गोंदावल्यातल्या सगळ्या देवळांना जाण्याची प्रथा ही इथूनच मनात रोजून गेली… थोरला राम, धाकटा राम, शनी, दत्त.. नाना मंदिर फिरत फिरत त्या सगळ्या देवळांच्या इतक्य सुरस कथा ऐकल्या आहेत की त्या आजही तितक्याच मनाला भिडतात… मग गावात फेर-फटका करता-करता आम्हा मुलांचे कोण लाड व्हायचे.. महाराजांचे फोटो असणारी किती लॉकेट्स जमवली होती मी तेव्हा… दुपारची वेळ होताच आई वगैरे स्वयंपाकघरात शिरायच्या.. महाराजांच्या…मदतीला.. केवढाल्या भाज्या निवडणे, चिरणे आणि काय काय.. तेव्हा ना.. शेणाने सारवलेला मंडप असायचा आणि पत्रावळीवर जेवण..कसलं अ‍ॅट्रॅक्शन होतं त्याचं पण.. आणि मग आम्ही मुलं पंगतीला ठेव, पाणी वाढ असली काम करायला पुढे सरसावायचो आणि मग सुरू व्हायचा एकच गजर.. रामनामाचा.. पंगतीत्त फिरत फिरत जय जय श्रीराम जय जय श्रीराम म्हणणार्‍या गुरूजींचा तो भारदस्त आणि भक्तिमय आवाज अजून घुमतोय मनात.. खरचं कोणी कधी बसून समजावून वगैरे नाही सांगितलं की तुला इथे श्रद्धा ठेवायचीय हं.. पण हे सगळं बघूनच आणि तिथल्या वातावरणाचा महिमा म्हणूनही.. आजही मनातली सगळी वादळ तिथेच जाऊन शमतील असा एक विश्वास अशी श्रद्धा वाटते.. पण आज असं वाटतयं आपण आपल्या पुढच्या पिढीला हीच ओढ लावू शकू का.. अर्थात आपल्या वागण्या-बोलण्यातून..का ते फक्त पाहतील सतत धावणार्‍या आई-वडिलांना.. आणि या धावण्यावरच नाही ना बसणार त्यांची श्रद्धा? किती हवे ? काय हवे? कशासाठी हवे याची उत्तरे मिळतील का त्यांना? अगदी त्यांचे पण सोडा पण आपल्याला तरी मिळतील का? की भुतकाळात कमावलेले अथवा आपसूक मिळालेले रूजलेले हे श्रद्धचे बीज आपणच भविष्याच्या तरतूदीच्या नादात गमावून नाही ना बसणार आपणच??

नाही कदाचित.. मनात ठाम ठरवले तर.. आजच्या सारखा एक दिवस सारखा सारखा येईल आयुष्यात जो मला आठवण करून देईल त्या सगळ्या गोष्टींची ज्या माझ्या माणसांनी मला अगदी हातात आणून दिल्यात, त्या सगळ्या दिमाखात माझ्या श्रद्धेला पाठबळच देतील..जुन्या श्रद्धा जपण्याची शक्ती.. त्यांना तितक्याच अलवारपणे पुढच्या पिढीकडे सोपवायची शक्ती देतील.. तितक्याच श्रद्धेने तितक्याच तन्मयतेने.. खात्री आहे मला…

3 views0 comments

Recent Posts

See All

खिडकी

प्रत्येकाची आपली अशी एक खास आवडती जागा असते. घराचा एखादा कोपरा, एखादी खोली, जिथे काय जादू असते माहित नाही पण जणू सगळ्या गोष्टी तिथे अगदी...

Rockstar

निरगाठ..

एक एक धागा नकळत उलगडत जातोय…ईकडून तिकडे.. एक एक वीण जुळवण्यासाठी.. कधी प्रवाहाबरोबर..कधी प्रवाहाविरुद्ध.. कधी त्याच्यासारख्या इतर...

Comments


bottom of page